माहिती

 • आदिशक्तीची माहिती :-

  श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार) हे गाव महाबळेश्वरपासून केवळ २० कि.मी. अंतरावर, तर प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. महाराष्ट्रतील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री क्षेत्र तुळजापुर व श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार) ही एकच मानली जातात म्हणूनच श्री समर्थ रामदास म्हणतात

  ।।तुळजापूर ठाकेना चालली पश्चिमेकडे।।
  ।।पार घाटी जगन्माता सद्य येवूनि राहीली।।

  श्रीरामवरदायिनी आईचे सुंदर देवालय हेमाडंपंथी पध्दतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभिकरण केले असलेल्याने मंदिराच्या सौंदर्यात अमाप भर पडली आहे. मंदिराच्या गाभा-यात सिंहासनावर दोन मुर्ती विराजित असून अडीच फूट उंचीची छोटी मुर्ती डाव्या बाजूस ती “श्री वरदायिनी” या नावाने ओळखली जाते. तर तीन फूट उंचीची मूर्ती उजव्या बाजूस असून ती “श्रीरामवरदायिनी” या नावने ओळखली जाते.


  || श्री रामवरदायिनी महात्म्य ||

  मंदिरातील सिंहसनावर आपल्या उजव्या बाजूला विराजमान असणारी मुर्ती ही श्रीरामवरदायिनी या नावने ओळखली जाते. प्रभु श्रीरामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते. अर्थात रामवरदायिनीची स्थापना प्रभु रामचंद्रांनी केली म्हणून श्रीरामवरदायिनी आर्इची ही आख्यायिका एकनाथ महाराजांनी आपल्या भावर्थ रामायणात, अरण्यकांड या भागात आणि पूढे श्रीधरस्वामींनी आपल्या रामविजय ग्रंथात सुरसपणे मांडलेली आहे.

  प्रभु श्रीरामचंद्र दंडक अरण्यात वनवास भोगत असताना रावणाने सीता देवीचे हरण केले ही कथा आपल्यास माहित आहेच. सीतेचा शोध घेत असताना राम शोकाकूल झाले. झाडांना व दगडांना कवटाळीत राम सीता शोक करीत मयूर पर्वतावर आले त्याचवेळी कैलासावर श्री शंकर हातात माळ घेवून श्रीरामच्या नावचा जप करीत होते. परंतु या श्रॄष्टीचे निर्मातेच कोणाच्या नावाचा जय करत आहेत हे पाहून शेजारी श्रीशंकरापुढे हात जोडून उभ्या असलेल्या पार्वती देवी अचांबित झाल्यां व त्यांनी शंकरांस विचाराले की‚ “हे स्वामी‚ तुमच्याहून कोण मोठे आहे की त्या नावचा आपण जप आणि ध्यान करत आहात?” तेव्हा शंकर म्हणाले‚ हे पार्वती जो रविकुलभूषण भक्तांच्या हदयात सतत वास करतो‚ जो अज्ञानाचा नाश करतो व जो सर्वश्रेष्ठ अंतर्यामी आहे‚ असा राम त्याचे मी ध्यान व जप करतो.” हे ऐकून पार्वतीला हसू आले. तिला विषाद वाटला की‚ जो राम रानवनात हिंडतो आहे‚ जो सीतेचा शोक करून झाडांना‚ दगडाना कवटाळतो आहे आणि ज्याची पत्नी रावणाने हरण केली आणि तिच्या वियोगाने ज्याची बुध्दी भ्रामिष्ट झाली‚ त्याचे ध्यान तुम्ही रात्रंदिवस करता हे एक मोठ नवलच आहे.

  पार्वतीला नवल वाटलेले पाहून श्रीशिव म्हणाले‚ “पार्वती प्रभु रामचंद्र हा अवतार आहे. राक्षसांच्या बंदिवासातून देवांना सोडविण्यासाठी परब्रम्हाने घेतलेल्या हा एक मानवी सद्गुणांनी भरलेला अवतार आहे आणि म्हणूनच पार्वतीने श्री रामाची परिक्षा घ्याची ठरविले. त्यासाठी पार्वतीने रामचंद्रांना भुलवून फसविण्यासाठी जानकीचे अर्थात सीतेचे रूप धारण केले. पार्वतीने सीतेचा वेष धारण करून शोकाकुल झालेल्या रामच्या समोर उभी राहीली. परंतु तिच्याकडे रामाने दुर्लक्ष केले‚ हे पाहून लक्ष्मणांस आश्चर्य वाटले ते रामचंद्रास बोलले‚ “हे प्रभु प्रत्यक्ष सीता आपल्यासमोर उभ्या आहेत आणि आपण तिच्याकडे दुर्लक्ष का करत आहात.” कारण पार्वतीने घेतलेले सीतेचे रूप पाहून लक्ष्मण मात्र निश्चित फसला होता. लक्ष्मणाच्या विनंतीवर राम म्हणाले की‚ “हे लक्ष्मणा मुळमाया आदिशक्ती पार्वतीने आपणास फसविण्यासाठी सीतेचे रूप धारण केले आहे.” हे ऐकूण मुळ आदिमाया पार्वतीने प्रभुराम हे परब्रम्हाचे पुर्णरूप आहे हे ओळखून मुळ रूप धारण करून श्रीरामांना वर देण्यास पुढे झाली व तिने प्रभुरामास वर दिला की‚ “तू रावणाचा संहार करशील व तुझी सीता तू परत मिळवशील.” प्रभुरामचंद्राने आदिशक्ती पार्वतीचे मुळरूप ओळखून तिची पुजा केली‚ तेच हे ठिकाण श्री क्षेत्र पार्वतीपूर. प्रभुरामचंद्रांच्या हस्तेच या आदिशक्तीची स्थापना झाली. तेव्हापासून या आदिशक्ती पार्वतीस "श्रीरामवरदायिनी" या नावने ओळखली जाते.

  ही मुर्ती तीन फुट उंचीची आहे. ही मुर्ती चर्तुभुज असून हातात आयुधे आहेत. गळयात मुंड माळा आहेत. पायाखाली महिषासुर आहे रामदासांनी स्थापन केलेल्या मुर्तीची झीज झाल्यामुळे अलिकडेच म्हणजे २५ डिसेंबर १९९१ रोजी नविन मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ही मुर्ती देखिल जून्या मुर्तीसारखीच रेखीव आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी शेजारी गद्ग या ठिकाणचे शिल्पकार श्री नागराज शिल्पी यांनी या मुर्तीचे नक्षीकाम केले आहे. या मुर्तीच्या मस्तकावर किर्तीमुख लिंग ‚ पायाखाली महिषासुर ‚ गळयात नरमुंड माळ ‚ हातामध्ये विविध आयुधे आहेत. नविन मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर जूनी मुर्ती कोयना नदीत विलीन करण्यात आली.

  || श्री रामवरदायिनी माताये नम: ||  || श्री वरदायिनी महात्म्य ||

  || कला काष्ठादि रूपेण परिणाम प्रदायिनी ||
  || सूर श्रेष्ठांना वर देवूनी जगतीनाम वरदायिनी ||

  मंदिरातील सिंहसनावर आपल्या डाव्या बाजूला विराजमान असणारी मुर्ती ही "श्रीवरदायिनी" या नावने ओळखली जाते. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेली ही मुर्ती‚ परंतु त्यापुर्वी पुरातन काळामध्ये खुदद् ब्रम्हा‚ विष्णु आणि महेश यांनी या वरदायिनी देवीची स्थापना केली आहे अशी आख्यायिका सांगितली जाते.

  स्कंद पुराणामध्ये घडलेली ही घटना प्रभव अरण्यातील आहे‚ त्याकाळी अतिबळ व त्याचा धाकटा भाऊ महाबळ या दोन दैत्यांनी विश्व पादक्रांत केले. या दोन दैत्यांना रोखण्यासाठी ब्रम्हा ‚ विष्णु आणि महेश यांनी त्यांच्याशी लढार्इ केली. या देवतांनी अतिबळाचा पराभव करून त्याल ठार केले परंतु आपल्या सैन्याचा हा:हाकार आणि भावाचा झालेला मॄत्यु पाहुन महाबळ दैत्य खुप क्रोधीत झाला व तो या तिन्ही देवतांवर धावून आला. या क्रोधीत दैत्यासमोर आपला निभाव लागणार नाही हे जाणून हे तिन्ही देवनी मुळमाया ‚ आदिशक्तीकडे उपासना करू लागले. “हे माये ‚ तु मुळ स्वरूपी ‚ अनादि - जगत्कारण - श्रेष्ठ व दुर्लक्ष आहेस ‚ तुला आम्ही वंदन करतो‚ हे माये तुच आम्हाला या संकटातून वाचव.”

  देवतांना या संकटातून वाचवण्यासाठी आदिमायेने मोहिनी करून त्या दैत्य महाबळास भुलविले व त्याच्याकडून वदवून घेतले की‚ “हे देवतांनो मी तुमच्यावर प्रसन्न आहे‚ काय पाहिजे तो वर मागून घ्या‚ तुमची मनिषा मी पुर्ण करेन.” यावर ब्रम्हादेवाने त्यास सांगितले‚ “जर तु प्रसन्न झाला असशील तर तुला आमच्या हातून मॄत्यु यावा अशी आमची इच्छा आहे.” दैत्य महाबळ धन्य व कॄतकॄत्य झाला. सर्व विश्व निर्माण करणारे देव त्याचा वध वर याचनेने करू इच्छितात या विचाराने त्याचा जन्म सकल झाला असे त्यास वाटले व त्याने त्यास संमती दर्शविली. तेव्हा त्याच्या पोट-यावर ब्रम्हा‚ वक्षावर विष्णु व मस्तकावर शंकर अशा क्रमाने देव बसून त्यांनी त्यालावर वर मागण्यास सांगितले‚ तेव्हा महाबळाने देवांकडून एक वर मागून घेतला की‚ “माझे शरीर मी तुम्हास अर्पण केले आहे‚ तेव्हा आता माझ्या पापाचे मोक्ष झाले आहे‚ तरीपण माझे गूढ यश लोकांनी गायिले असता त्यांचे पाप नष्ट व्हावे व सुख विस्तार व्हावा म्हणून आता प्रमाणेच आपण नेहमी माझ्या शरीरावर राहावे.” तेव्हा त्रिगुणयुक्त देवांनी त्याचा वध केला व प्रसन्न होऊन त्याला वर दिला की "हे श्रेष्ठ असुरा तुझा देह लिंगरूप राहून तुला महाबळ हे नाव मिळेल व तुला नमन केले असता तु भक्तांच्या पापाचे शमन करशील आणि तू महाबळेश्वर या नावाने जगप्रसिध्द होशील". या महाबळाचा पराभव केल्यामुळे या तिन्ही देवतांनी त्यांना वर देणा-या आदिशक्तीची स्तुती केली आणि अष्टदिशांची पाहणी करून तिची स्थापना मंगलमय व निसर्गयुक्त अशा कोयनेच्या तीरावर “वरदायिनी”या नावाने केली. त्यांनी त्या ठिकाणास पार्वतीपुर या नावने संबोधिले. अशाप्रकारे श्री वरदायिनी देवीची महात्म सांगितले जाते.

  || श्री वरदायिनी माताये नम: ||


 • यात्रा - उत्सव:-

  नवरात्र उत्सव:
  नवरात्री मध्ये देवीच्या मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस देवीचा उत्सव मोठया उत्साहात व थाटामाटात केला जातो. अगोदरच निसर्गाने सॄष्टी सौंदर्याचा मुक्त वर्षाव या परिसरावर केलेला आहे. परंतु नवरात्रीमध्ये नुकताच वर्षाऋतू संपत आलेला असतो. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

  अश्र्विन शुध्द प्रतिपदेपासून सुरू होणारा देवीचा नवरात्रौत्सव पारंपारिक पध्दतीने श्रध्दापूर्वक व मोठया उत्साहात साजरा केला जातो. देवीला अलंकार घातल्यानंतर घट बसवून घटस्थापना केली जाते व नवरात्रौत्सवास प्रारंभ होतो. दररोज सकाळी ११: ०० वाजता व रात्रौ ८:०० वाजता देवीची आरती केली जाते. या काळात नवचंडी होमहवन इत्यादी धार्मिक कार्यक्रम चालू असतात तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. नवरात्र संपल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा म्हणजेच सिमोल्लंघन. या दिवशी भक्तगणांचा उत्साह ओसंडून वाहात असतो. देवीच्या पालखीत मूर्ती स्थापून पालखीची मिरवणूक वाजत गाजत लेझिम ढोल यांच्या तालावर नॄत्य करीत मिरवणूक काढण्यात येते. गावतील सुवासिनी घरासमोर सुंदर रांगोळी काढून मिरवणूकीचे स्वागत करतात. पालखीतील देवीची खण नारळ यांनी ओटी भरतात. सायंकाळी परंपरेनुसार सोने लुटून दस-याचा आनंद साजरा केला जातो.

  वार्षिक यात्रा:
  देवीचा यात्रोत्सव चैत्र वैद्य त्रयोदशी पासून सुरू होवून तो वैशाख शुध्द षष्ठी पर्यंत चालू असतो. पहिल्या दिवशी देवीची गुढी काठी उभारून प्रदोष काळाच्या सुमूहर्तावर देवीच्या पालखीत शंकराची मूर्ती ठेवून गावतून पालखीची मिरवणूक काढण्यात येते. घरोघरी सुवासिनी पालखीला ओवळून भक्ती भावने नमस्कार करतात. मानकरी लोक पालखीवर चौ-या व अब्दागिरी ढाळत असतात. अशा थाटमटात मिरवणूकीचे शंकाराचे मंदिरात आगमन होते. तसेच श्री रामवरदायिनी मातेस व सर्व देवदेवतांचा अभिषेक करण्यात येतो. या दिवशी सत्यनारायणाची महापुजा करण्यात येते. दुस-या दिवशी 43 गांवातील देवाचे विडे वर्तवण्या येतात.

  यात्रेच्या तिस-या दिवशी म्हणजेच चैत्र आमावस्येला आसपासच्या गावांमधून त्या त्या गावचे ग्रामदैवत गुढीच्या काठीच्या रूपाने घेवून लोक मोठया श्रध्देने यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात मंदिराचे सरहद्दीवर त्याचे यथायोग्य स्वागत व मानपान केले जाते. जवळ जवळ अर्धी रात्र या विविध ठिकाणांहून येणा-या दैवतांच्या आगमनात व मानसन्मान करण्यात जाते. मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे तेथे बगाड लागते. बगाड म्हणजे देवीच्या मंडपासमोरील लाटेवर मानक-यांनी आणलेल्या लांबलचक लाकडावर मानकरी सुतार अंबील घेऊन बसतात आणि दोन्ही टोकच्या दो-या मानकरी आणि श्रध्दाळू भक्त घेऊन धावतात व उंचखांबवरील लाट गोलगोल फिरवितात. त्यानंतर आंबील भूमिअर्पित केल्यानंतर आरती वगैर होते. बगाडाचा कार्यक्रम संपल्यानंतर विविध करमणूकीचे कार्यक्रम रात्रभर चालू असतात. अशाप्रकारे आमावस्येपासून वैशाख शुध्दपंचमी पर्यंत हे कार्यक्रम नित्य उत्साहात चालू असतात. दररोज सांयकाळी आरतीला भक्तगणांच्या लेझीम ढोलची साथ लाभल्याने खूपच रंगत येते. दरम्यानच्या काळात विविध कार्यक्रम क्रिडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. अक्षय्य तॄतीयेला सुवासिनींचे हळदीकुंकू मोठया उत्साहात पार पडते. पंचंमीला यात्रेचा शेवटचा दिवस असतो याला छबिना म्हणतात. या दिवशी मंदिरात लघुरूद्रभिषेक, होमहावन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व पहाटे पाच वाजता देवीची मूर्ती पालखीत ठेवून पालखीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. गावतील प्रत्येक घरी सुवासिनी पालखीला ओवळतात. पालखी पुन्हा मंदिरात येते. यानंतर लळिताचा कार्यक्रम होतो. लळीत म्हणजे यात्रेचे पारणेच असते देवीची वैभवात पूजा पाद्दपूजा व अभिषेक झाल्यानंतर सर्व भक्तगण तिर्थ प्रसाद घेवून आपल्या परतीच्या प्रवासला सुरूवात करतात.

  कार्यक्रम
  दिवस कार्यक्रम
  पहिला दिवस श्री रामवरदायिनी मातेस व सर्व देवदेवतांचा अभिषेक‚ श्री सत्यनारायणाची महापूजा‚ गावातून पालखी मिरवणूक‚ ‘श्री’ ची काठी उभारणे
  दुसरा दिवस 43 गांवातील देवांचे विडे वर्तवणे
  तिसरा दिवस ‘श्री’ ची महापूजा‚ विविध गांवातील देवदेवतांचे आगमन‚ बगाड‚ करमणुकीचे कार्यक्रम
  चौथा दिवस ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ करमणुकीचे कार्यक्रम
  पाचवा दिवस ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ करमणुकीचे कार्यक्रम
  सहावा दिवस ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ करमणुकीचे कार्यक्रम
  सातवा दिवस ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ हळदी कुंकू, करमणुकीचे कार्यक्रम
  आठवा दिवस ‘श्री’ ची आरती, कंरड, ढोल, लेझीम आरती‚ करमणुकीचे कार्यक्रम
  नववा दिवस होमहवन, शालेय कार्यक्रम, मान्यवरांचे स्वागत‚ करमणुकीचे कार्यक्रम
  दहावा दिवस छबिना व पालखी मिरवणूक लळीत, लघुरूद्राभिषेक व होम समाप्ती, महाप्रसाद व यात्रा समाप्ती   मंदिराची वेळ:
   सकाळी ०७:३० ते संध्याकाळी ०६:३० दर्शनांस खुले राहिलं
   मंदिर दुपारी ०१:०० ते ३:०० बंद राहील

   अभिषेकाची वेळ:

   सकाळी ०७:३० ते सकाळी ०९:००
   सकाळी ०९:०० नंतर आर्इच्या पादुकानां अभिषेक करता येर्इल
   सुचना: नैवदय येथेच करून दाखवाव. अधिक महितीकरिता आमच्यांशी संपर्क साधा

   आरतीची वेळ:

   सकाळी ११:०० वाजता
   संध्याकाळी ०७:०० वाजता

 • माहिती

  मंदिराची वेळ:
  सकाळी ०७:३० ते संध्याकाळी ०६:३०
  दर्शनांस खुले राहिलं

  मंदिर दुपारी ०१:०० ते ३:०० बंद राहील


  अभिषेकाची वेळ:
  सकाळी ०७:३० ते सकाळी ०९:००


  आरतीची वेळ:

  सकाळी ११:०० वाजता
  संध्याकाळी ०७:०० वाजता


  अभ्यंग स्नानाची वेळ:
  सकाळी ०७:३० वाजता

  आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण,

  पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
  ई मेल: adishakti11@yahoo.com